पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी IIT दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नव्या प्रवासासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एक मजेशीर किस्सा घडला. "आज सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभाला उपस्थित आहेत, पण सर्वांच्याच मनात भविष्याबाबत काही ना काही नक्कीच सुरू असेल."
"मी काही बाबा बागेश्वर नाही, पण तुमच्या मनात काय चाललंय याचा अंदाज मला नक्कीच येतोय. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येणाऱ्या उद्याचे एक वेगळं चित्र असतं" असं मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलं. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, "एका बाजूला काही विद्यार्थी आपल्या पहिल्या नोकरीची आणि पगाराची वाट पाहत असतील, तर काही जण स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहत असतील."
"आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात"
'काही विद्यार्थी पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे ध्येय बाळगून असतील. प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आणि ध्येय वेगळं असलं, तरी आज सर्वांच्याच मनात एक वेगळाच उत्साह आहे." मोदींनी विद्यार्थ्यांना IIT दिल्लीतील त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण करून दिली. "जणू कालच ओरिएंटेशन झालं होतं आणि पाहता पाहता आज दीक्षांत समारंभाचा दिवस उजाडला, असंच सर्वांना वाटत असेल. आजपासून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे" असं म्हटलं.
"आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही आऊट ऑफ सिलॅबस"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना गुरुमंत्र
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोदींनी "आज जसा तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटत आहे, तसाच मलाही तुमच्या सर्वांचा खूप अभिमान आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या यशासाठी मेडल मिळालं आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र, यात आणखी काही मुली असत्या तर मला अधिक आनंद झाला असता. माफ करा, पण फक्त एक-दोन का? आणखी मुली असायला हव्या होत्या" असं म्हटलं आहे.



प्रतिक्रिया द्या