FIFA World Cup Final 2026 Lionel Messi Is In Tears After Losing The Final To Spain : फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये फुटबॉल जगतातील सर्वकालीन महान मेस्सीवर रिकाम्या हाती निरोप घेण्याची वेळ आली. गत हंगामात चॅम्पियन ठरल्यावर मेस्सीनं सलग दुसऱ्यांदा संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी कंबर कसली. यंदाच्या हंगामात ८ गोल डागत त्याने संघाला फायनलपर्यंत नेले. पण स्पेनच्या एकीच्या बळासमोर त्याची जादू काही दिसली नाही. २०१० नंतर पुन्हा एकदा अतिरिक्त वेळेत स्पेनच्या संघाने जेतेपदाचा डाव साधला. सलग दुसरे जेतेपद मिळवण्याच स्वप्न अधुरे राहिल्यावर मेस्सीला अश्रू अनावर झाले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर लिओनेल मेस्सी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याने मेस्सी स्पष्टपणे निराश दिसत होता. पदक स्वीकारताना त्याला अश्रू अनावर झाले. मेस्सीचा हा भावनिक क्षण टिपणारे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विश्वचषक, गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल... सगळंच हुकलं
अर्जेंटिनाचा संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरेल, अशी मेस्सीच्या चाहत्यांना आशा होती. एवढेच नव्हे तर मेस्सी गोल्डन बूट आणि गोल्डन बॉलच्या शर्यतीतही प्रमुख दावेदार मानला जात होता. मात्र, अखेरीस त्याच्या हातून सर्व काही निसटले. तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन गोल करत स्पर्धेत एकूण १० गोल करणाऱ्या फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने गोल्डन बूट पुरस्कार पटकावला. तर गोल्डन बॉलच्या शर्यतीत स्पेनच्या रॉड्रिगो हर्नांडेझ कास्कांटे अर्थात रॉड्रीने बाजी मारली.


प्रतिक्रिया द्या