डॉन फर्दून अर्देसर दोरडी ऊर्फ बाबा फर्जन यांच्या संशयास्पद संपत्तीच्या तपासात त्यांच्या कौटुंबिक आयुष्याशी संबंधित नव्या बाबी उघड होत आहेत. पत्नी आणि दोन्ही मुलांशी अनेक वर्षांपूर्वीच संबंध तुटल्यानंतर बाबा फर्जन यांनी पुण्यात राहणाऱ्या बहिणीच्या डॉक्टर मुलीलाच स्वतःची मुलगी मानले होते. त्यांची दुसरी बहीण कॅनडात असून पोलिसांचा तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. दुसरीकडे धाकटा मुलगा फिरदोस यांनी 'वैयक्तिक कारणांमुळे आम्ही वडिलांपासून दूर झालो. मात्र आम्हीच त्यांचे कायदेशीर वारस असून संपत्ती, रोख रकमेसह सर्व मालमत्तेवर दावा करणार असल्याचे स्पष्ट केले. तपासादरम्यान पोलिसांनी बाबाच्या कुटुंबातील दोन जवळचे सदस्य आणि त्याच्या दोन खास मित्रांचे जबाब नोंदवले. या जबाबानुसार बाबाने आपल्या दोन्ही सख्ख्या मुलांशी आणि पत्नीशी वर्षानुवर्षे कोणताही संबंध ठेवला नव्हता. पुण्याच्या बहिणीची मुलगी डॉक्टर असून, ती अनेकदा शहरात मामाकडे म्हणजेच बाबाकडे येई. तिची मिटमिटा येथील बंगल्यात नेहमी ये-जा असायची. मंगळवारी पोलिसांनी या डॉक्टर भाचीचाही सविस्तर जबाब नोंदवून घेतला. छावणी ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव, अंमलदार रवींद्र देशमुख अधिक तपास करत आहेत
फिरदोसचा संपत्तीवर दावा
प्रश्न : तुमचे वडील शहरात 'डॉन' म्हणून ओळखले जायचे, तुम्ही वडिलांकडे कसे पाहायचे?उत्तर : ते स्वभावाने आणि वैयक्तिक पातळीवर चांगले होते. केवळ कौटुंबिक वादांमुळे आम्ही वेगळे झालो होतो.
प्रश्न : मिटमिट्याच्या बंगल्यातील कारवाईची माहिती कधी मिळाली?उत्तर : वृत्तपत्रांमधूनच समजले.
प्रश्न : वडिलांच्या एवढी संपत्ती, रोख, शस्त्रसाठ्याची कल्पना होती का?उत्तर: मुळीच नाही. त्यांच्याकडील संपत्तीची कधीच माहिती नव्हती.
प्रश्न : शीलासोबत नेमके नाते काय आहे?उत्तर : ती केवळ एक केअरटेकर होती. ती वडिलांची पत्नी नाही.
प्रश्न : संपत्तीवर दावा करणार का ?उत्तर : संपत्तीची कोणतीही कागदपत्रे आम्हाला मिळू दिलेली नाहीत. आम्ही ती मिळवू. आम्हीच त्यांचे कायदेशीर वारसदार आहोत. त्यामुळे आम्ही या सर्व संपत्तीवर हक्क सांगू.





प्रतिक्रिया द्या