छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आता अपघाताची रेषा म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर भीषण असे अपघात झाले आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा ते दुसरबीड दरम्यान एक विचित्र घटना घडली. महामार्गावर एक लोखंडी अँगल निघाला होता, अँगलला धडकून भरधाव जाणाऱ्या एका महिंद्राच्या एसयूव्हीचे इंजिनच फुटले आहे. सुदैवाने, नशीब बलवत्तर म्हणून कार मधील चौघांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणारी एक भरधाव महिंद्रा एसयूव्ही सिंदखेडराजा ते दुसरबीड दरम्यान प्रवास करत होती. तळेगाव जवळ असलेल्या पुलावर मध्यभागी रस्त्यावर असलेल्या लोखंडी अँगलचा तुकडा पडला होता. पण, हा लोखंडी अँगल थेट उभा होता.
आधीच समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा असल्यामुळे महिंद्रा एसयूव्ही आपल्या वेगात होती. त्यामुळे समोर आलेला लोखंडी अँगलला एसयूव्ही धडकली. हा धडक इतकी भीषण होती की, अँगल हा महिंद्रा एसयूव्ही च्या इंजिनला धडकले. यामध्ये इंजिन अक्षरशः फुटले.
एवढेच नाहीतर महिंद्रा एसयूव्ही चे मागील टायर सुद्धा फुटले होते. त्यानंतर महिंद्रा एसयूव्ही अनियंत्रित झाली आणि पुढे जाऊन पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने नशीब बलवत्तर होते म्हणून कार पुलावरून कोसळण्यापासून वाचली. या महिंद्रा एसयूव्ही मध्ये ४ जण प्रवास करत होते. नशीब चांगले होते म्हणून चारही जण वाचले. पण, या अपघातात महिंद्रा एसयूव्ही चे इंजिन फुटून मोठे नुकसान झाले आहे. पुलाचा भला मोठा अँगलचा तुकडा तुटून वर आलेला होता मात्र ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे हा अपघात घडला.
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर नजीकच्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ज्या ठिकाणी अँगल निघाला होता, त्या ठिकाणी वार्निंग बोर्ड लावण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पुलावर जो अँगलचा तुकडा उभा राहिला होता, तो फक्त वेल्डिंग केलेला होता. महामार्गावर वाहनांच्या वजनांमुळे वेल्डिंग तुटले असल्याचे समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर इतका निष्काळजीपणा जर होत असेल तर इतका खर्च कशासाठी केला, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थितीत केला आहे.





प्रतिक्रिया द्या