जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून, आंदोलनस्थळावरून जरांगे पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत असतानाच शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट दिली.
या भेटीत त्यांनी जरांगे पाटील यांची प्रकृती आणि आंदोलनाची परिस्थिती जाणून घेत 'शिंदे साहेबांची आरक्षणाबाबत तळमळ कायम असून, सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा,' अशी भूमिका मांडली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शहाजी बापूंच्या या भेटीला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या सर्वांचे दैवत मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांचा संघर्ष स्वार्थासाठी नाही. आज मराठा समाजाच्या जमिनीचे तुकडे होत आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. अंतरवाली सराटीच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काळजी आहे. आरक्षणाच्या प्रश्नाबाबत शिंदे साहेबांची तळमळ कायम आहे. काही लोक चुकले असतील; मात्र शिंदे साहेबांना पांडुरंगाची शपथ, त्यांची तळमळ कायम आहे. ते आरक्षणाच्या प्रश्नासाठी तळमळीने प्रयत्न करीत आहेत. मात्र आडकाठी कोण करीत आहे, हे तुम्हालाही माहीत आहे; मला सांगण्याची गरज नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
'आम्हाला कोणाच्या ताटातील काही नको आहे. आम्ही आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला आरक्षण मिळू लागले तर दुसऱ्यांनी आडकाठी करू नये. पूर्वी आरक्षणाची गरज नव्हती म्हणून आम्ही कुणबी दाखले घेतले नाहीत; आता मात्र त्याची अत्यंत गरज आहे. कुणबी दाखले अडविणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी आणि सर्वांना दाखले मिळावेत,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करताना पाटील म्हणाले, 'पूर्वी ज्या पाटलीनबाईंचा चेहराही दिसत नव्हता, त्यांनाही आज रानात खुरपणी करण्यासाठी जावे लागत आहे. मराठा समाजाची परिस्थिती दारिद्र्याकडे चालली आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून लवकर निर्णय घ्यावा.' तसेच, 'तुम्हा सर्वांच्या वतीने मी माझ्या परीने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही याबाबत बोलणार आहे. सरकारमधील सर्व नेत्यांनी या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहून निर्णय घ्यावा,' असे आश्वासन त्यांनी दिले.
उपोषणस्थळी जरांगे पाटील यांची अवस्था पाहून शहाजी बापू पाटील भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रू पुसल्यानंतर त्यांनी तत्काळ माजी मंत्री शंभूराज देसाई यांना दूरध्वनी करून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी देसाई यांनीभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार हा प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
जरांगे पाटलांची तब्येत काही प्रमाणात खालावली
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटीत सुरू झालेल्या त्यांच्या उपोषणाला चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत काही प्रमाणात खालावली आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर आता सरकारनेही हालचाल सुरू केली आहे. सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा समावेश आहे. यावेळी जरांगे पाटील भावुक झाल्याचे पहायला मिळाले.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जरांगे पाटलांशी बोलताना म्हटले की, आम्हाला आपली खुप काळजी आहे म्हणून इथे आलो आहे. जे शिबिर लावतात, त्यात जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य आहे ते आपण करत आहोत. सरकार सराकात्मक आहे. हैदराबाद गॅझेटच्या नोंदींनुसारही प्रमाणपत्र दिले जात आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटवरही प्रक्रिया सुरू आहे. जात प्रमाण पत्रांसाठी नोडल अधिकारी नेमणार आहोत. प्रांत अधिकारी यांनी दिलेला दाखला मोठा पुरावा मानला जातो. व्हिलिडीटी फार कमी केसेसमध्ये लागते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन काहीतरी मार्ग काढणार आहे. एकही मुलाचे नुकसान होणार नाही.
यावर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, तुम्ही आलात तुमचा सन्मान आहे. तुमचा वेळ वाया घालवू नका. सरकार जाणून बुजून वेळ वाया घालवत आहे. ते तुमच्या आवाक्यातले नाहीत. यानंतर तुम्ही येऊ नका, तुमच्या स्तरावरच्या गोष्टी नाहीत. तुमची फरपट करून घेऊ नका. तुमचा अपमान करत नाहीये. आमच्या मुलांचे वाटोळे झाले. २९ तारखेला १ वर्ष झाले. प्रत्येत गावात शिबिर सुरू होऊ शकते. कशाला पाहिजे ४ महिने ? सकाळी जीआर काढा. मला उद्या सकाळपासून सुरुवात पाहिजे. त्यांना सांगा तो माणूस ऐकायला तयार नाही.
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, आपल्या कार्यालयात ६ व्हॅलिडिटी पडून आहेत. मी आपल्या अधिकाऱ्याला फोन लावून दिला होता. ६ महिने झाले अजून काही झाले नाही. उगाच त्रास घेऊ नका. तुम्ही अभ्यास करून अधिकारी झाला आहेत. यातील एका ही मंत्र्याने पुस्तक वाचले आहे का? मला शाईनिंग शिकवत आहेत. यांचे तुम्हाला ऐकावे लागत. मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. मी चर्चेला तयार आहे. मंत्राला तुमचे पुस्तक वाचायला द्या येते का पाहू, तुम्ही जा आणि त्यांना सांगा जीआर आणा.
आंतरवालीत रक्ताचा चिखल झाला होता
पुढे भावुक होत जरांगे पाटलांनी म्हटले की, आजच्या दिवशीच आमच्या लोकांवर गोळ्या घातल्या होत्या. आमची मुल त्यांच्या आईबापाला शोधत होती. अजूनही काही लोकांना चालताही येत नाही. रक्ताच्या थारोळ्यात आमचे लोक पडले होते. इंग्रज आणी मुघलांनी जसे केले त्यापेक्षा वाईट केले. १५ दिवस रक्ताचा वास येत होता. रक्ताचा चिखल झाला होता.





प्रतिक्रिया द्या